अवश्य वाचा


  • Share

आ.थोरात काँग्रेसचे गटनेते

मुंबई (प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदारांच्या बैठकीत थोरात यांच्या निवडीची घोषणा केली. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले विधीमंडळ गटनेते निवडलेले आहेत. मात्र काँग्रेसने गटनेता निवडलेला नव्हता. मात्र, आता सत्ता स्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची गटनेतेपदी निवड केली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची महाआघाडी बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल, असा विश्‍वास थोरात यांनी ट्विट करत दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची कांग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्याने संगमनेरमध्ये आनंदोत्सव साजरा होत असून लवकरच त्यांची उपमुख्यमंत्री पदी निवड होणार असल्याने संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. काँग्रेसचे निष्ठावान नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि संगमनेर मधून सलग 8 वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आमदार बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या गटनेतेपदी एकमताने निवड झाल्याची बातमी संगमनेरात येताच तालुक्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडणूक लढवत असून सलग 8 वेळेस ते विजयी झाले आहेत. सध्याच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा विजय झालेले ते सर्वात वरिष्ठ सभासद आहेत. त्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांना हा मान देण्यात आला आहे. अडचणीच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळून त्यांनी काँग्रेस पक्षाला नवी संजीवनी दिली आहे. संयम , पारदर्शकता आणि एक निष्ठेचे फळ म्हणून संगमनेर करांना बाळासाहेब थोरात यांच्या रूपानं सर्वोच्च पदावर काम करण्याचा मान मिळाला आहे.